एमपीसी न्यूज : आज 5 सप्टेंबर देशाचे माजी राष्ट्रपती डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांची (Alandi) जयंती देशभरात ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येते. या अनुषंगाने आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज या सर्व विभागातील सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे व श्रीराम कृष्ण वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प. मोहन महाराज शिंदे, प्रमुख उपस्थिती आदर्श शिक्षक पुरस्कृत व प्रसिद्ध लेखक, कवी युवराज माने, एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झालेली रसिका नितीन कुटे, संस्थेचे सचिव अजित वडगांवकर, सदस्य अनिल वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी उमेश कुलकर्णी, पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष कृष्णा महाराज शेळके, सहसचिव मनीषा केदार, कामिनी मुंढे व पत्रकार बांधव एम डी पाखरे ,अनिल जोगदंड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री चक्रधर स्वामी, डॉ.राधाकृष्ण सर्वपल्ली यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून शिक्षक चाकोरीच्या बाहेर जाऊन प्रशालेत अनेक उपक्रम राबवतात. त्यांच्या कष्टातून आपल्या प्रशालेचे नाव राज्यभर गाजत आहे. त्यांच्या कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी याकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यानिमित्ताने पुढील काळामध्ये आपल्या प्रशालेतील शिक्षकांना राज्यस्तरीय, देशस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व्हावा ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यालयाची माजी विद्यार्थिनी रसिका नितीन कुटे हिची एमपीएससीच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
या निमित्ताने आपल्या मनोगतातून रसिका कुटे हिने स्वत: वरील विश्वास, मेहनत आणि आई-वडिलांचा, गुरुजनांचा आशीर्वाद यामुळे यश मिळाले. मोठी स्वप्ने पहावी व ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत. जिज्ञासा आणि मेहनत यांच्या जोरावर प्रामाणिक प्रयत्न करून यश संपादन करावे असा मोलाचा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
तदनंतर शिक्षक दिनाच्या औचित्य साधून संस्थेच्या वतीने प्रशालेच्या सर्व विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ‘गुरुजी तू मला आवडला’ हे पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.
शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनातील काही प्रसंगांना उजाळा दिला. विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे यांनी आपल्या मनोगतामध्ये दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त संस्थेच्या मार्फत सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात येतात त्याबद्दल संस्थेचे आभार मानले. जीवनात गुरुचे महत्व सांगत एक शिक्षक अनेक आदर्श विद्यार्थी घडू शकतो असा विश्वास व्यक्त केला.
तदनंतर युवराज माने यांनी आपल्या मनोगतातून लेकरांसाठी राबणाऱ्या हातांचा सन्मान (Alandi) करणाऱ्या श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे अभिनंदन करत गाई पेक्षा वासरू मोठे झाल्याचे कौतुक रसिका कुटे हिला शुभेच्छा देऊन केले. जो धडपडतो तो माणूस आणि जेव्हा माणसाची धडपड संपते तेव्हा तो संपतो. शिक्षक म्हणजेच गुरुजी. हे विद्यार्थ्यांसाठी आनंदाचे झाड झाले पाहिजे, शिक्षक हा परिस आहे ज्या विद्यार्थ्याला शिक्षकाचा स्पर्श होईल त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षकाचे महत्व सांगत जगात तीनच व्यक्ती आहेत ज्या विद्यार्थी पुढे गेल्यानंतर आनंदीत होतात त्या म्हणजे आई, वडील व शिक्षक असे मत मांडले.
Pawana Dam : पवना धरण 100 टक्के; 2220 क्युसेक्सने विसर्ग
शेवटी अध्यक्षीय मनोगतातून ह. भ. प. मोहन महाराज शिंदे यांनी हा विद्यार्थी माझा आहे असे अभिमानाने सांगणारे व्यक्तिमत्व म्हणजे शिक्षक. ज्ञान आणि विज्ञान यांचे मिश्रण म्हणजे ज्ञानेश्वरी, ज्ञानोबांनी आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये अनेक संशोधनाचा आणि विज्ञानाचा संदर्भ दिलेला आहे. आपण आपल्या संस्कृतीचा वारसा जपला पाहिजे असा संदेश देत प्रशालेत राबवण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी यशस्वी व्यक्तींचा आदर्श घेऊन आपले जीवन यशस्वी करावे असा संदेश दिला. तसेच अजित वडगावकर व कुटुंबीयांचं कार्य म्हणजे एका छोट्या रोपट्याचा एवढा मोठा वड केला. त्याच्या सावलीत तुम्ही आज शिक्षण घेत आहात खरोखर तुम्ही भाग्यवान आहात असे त्यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल गौरवोद्गार काढून विद्यार्थ्यांना संबोधित केले.
कार्यक्रमाचे औचित्य साधून प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी पुणे आयोजित पूजनीय दादासाहेब (Alandi) एकबोटे जिल्हास्तरीय आंतरशालेय संस्कृत पाठांतर स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘संस्कृत पंडित शहाजीराजे भोसले’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला. व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांचे वतीने घेण्यात आलेल्या खो – खो स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल खो खो च्या सर्व संघाचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदीप काळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठलदास गुट्टे व पौर्णिमा मोरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo