एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील निगडी, भोसरी आणि चिंचवड परिसरातील तीन रुग्णालयांमध्ये ( Chinchwad ) बॉम्ब ठेवला असल्याचा मेल रुग्णालयाला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले. याबाबत रुग्णालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकाने रुग्णालयांमध्ये जाऊन संपूर्ण परिसराची पाहणी केली. यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.
निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत धन्वंतरी रुग्णालयाला रुग्णालयात बॉम्ब ठेवला असल्याचा मेल आला. त्यामुळे रुग्णालयात चांगलीच धावपळ उडाली. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली. निगडी पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली.
Moshi : इंद्रायणी नदीमध्ये बुडालेल्या तिसऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला
निगडी पोलिसांनी बॉम्ब शोधक नाशक पथकाला पाचारण केले. या पथकाने रुग्णालयाचा संपूर्ण परिसर पिंजून काढला. मात्र त्यामध्ये कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. त्याचवेळी भोसरी परिसरातील मेडिक्लोवर आणि चिंचवड येथील मोरया या रुग्णालयांना देखील अशाच प्रकारचा मेल प्राप्त झाला.
खबरदारी म्हणून पोलिसांनी त्या दोन्ही रुग्णालयांमध्ये जाऊन पाहणी केली. मात्र तिथे देखील कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. तीनही रुग्णालयांना आलेल्या मेलमध्ये एका दहशतवादी संघटनेचे नाव वापरण्यात आले आहे. हे मेल कोणी आणि कशासाठी केले, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे.
पुणे शहरातही बॉम्बची अफवा
पुणे शहरात देखील शनिवारी (दि. 18) बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. पुणे शहरातील नोबेल रुग्णालय आणि फिनिक्स मॉलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल पुणे पोलिसांना मिळाला होता. तपासणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघडकीस आले. त्याबाबत पुणे पोलिसांकडून तपास सुरू ( Chinchwad ) आहे.