Chinchwad : विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण विकासासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षकाची भूमिका महत्त्वाची – आयुक्त शेखर सिंह


एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून (Chinchwad) त्यांचा सर्वांगीण तसेच गुणवत्तापूर्ण विकास व्हावा यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांची भूमिका महत्त्वाची आहे. महापालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या नवीन संकल्पना आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी देखील ते सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात ही बाब कौतुकास्पद आहे. यापुढे देखील महापालिका शाळा आणि विद्यार्थ्यांचा गुणवत्तावाढीचा आलेख अधिकाधिक वाढविण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची गरज असून निरंतर प्रगतीसाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने शिक्षकदिनाचे औचित्य साधून आदर्श शिक्षकांना पुरस्कार देऊन आज सन्मानित करण्यात आले. चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास उपस्थित मुख्याध्यापक तसेच शिक्षकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उप आयुक्त अण्णा बोदडे, सहायक आयुक्त विजयकुमार थोरात, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, प्रशासन अधिकारी संगीता बांगर, सहायक प्रशासन अधिकारी रजिया खान, माध्यमिक प्रशासन अधिकारी राजीव घुले, माध्यमिक शिक्षण अधिकारी बुधा नाडेकर तसेच विविध शाळांमधील मुख्याध्यापक,पर्यवेक्षक व शिक्षक उपस्थित होते

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, भारत देशात गुरु आणि शिष्य परंपरेमध्ये गुरुंना महत्त्वपूर्ण दर्जा दिला जातो. गुरु आणि शिष्याचे नाते खूप पवित्र मानले जाते. शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील नाते कालानुरूप बदलत आहे. शिक्षक विद्यार्थ्यांचे भवितव्य घडवत असतात. विद्यार्थ्यांना घडविण्याचे अवघड कार्य शिक्षक करत असतात. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या वतीने शिक्षण विभागात विविध उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वजण उत्तम सहकार्य करत असतात.

Alandi : आळंदी-पुणे रस्त्यावरील खड्डे गणेशोत्सवाआधीच पालिका प्रशासनाने बुजवले; नागरिकांनी मानले आभार

यामध्ये पालकांचा देखील सहभाग वाढविणे गरजेचे आहे, असे मत आयुक्त सिंह यांनी व्यक्त केले. महापालिकेच्या काही शाळांमध्ये नवीन वर्गखोल्या बांधण्याचे महापालिकेचे नियोजन आहे. विद्यार्थ्याची सुरक्षा महत्वाची असून याकडे देखील सर्वांनी बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. याबाबत महापालिका देखील आवश्यक कार्यवाही करत आहे. विद्यार्थ्यांमधील कमतरता भरून काढण्यासाठी सर्वांनी सांघिक भावनेने काम करणे आवश्यक आहे, असे देखील आयुक्त सिंह म्हणाले. आदर्श शिक्षकांचे आयुक्त सिंह यांनी अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.

शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र आणि महत्त्वपूर्ण काम करत असत्तात. विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. आणि ही जबाबदारी शिक्षक लीलया पार पाडत असतात. समाजात तसेच विद्यार्थी आणि पालकांच्या नजरेत शिक्षकांचे स्थान उच्च असते. पालकांचा शिक्षकांवर खूप विश्वास असतो त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी अधिक असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले.

या कार्यक्रमात आदर्श शिक्षकांना महापालिकेच्या वतीने पुरस्कार (Chinchwad) देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा समावेश होता. नेहरूनगर येथील बालवाडी विभागाच्या पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या अनिता आब्दुले, पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या रंजना साळवी, काळेवाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या सविता देशनेहरे यांना सन्मानित करण्यात आले.

प्राथमिक शाळांतील पिंपळे गुरव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या निलिमा अर्बुणे, जाधववाडी येथील कन्या प्राथमिक पीसीएमसी पब्लिक स्कूलचे संदीप वाघमारे, निगडी येथील शाळेच्या भाग्यश्री चेचे , पिंपळे गुरव येथील शाळेच्या करुणा परबत, पिंपळे सौदागर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या शामल दौंडकर, चिखली येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलचे विकास साकत, माळवाडी येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या राजश्री सातपुते, चऱ्होली येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या नीलम वर्पे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

माध्यमिक शाळांमध्ये नेहरूनगर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या नंदा सोंडकर, रुपीनगर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलचे गुलाबसिंग पाडवी, नेहरूनगर येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलचे संतोष मुन्तोडे, थेरगाव येथील पीसीएमसी पब्लिक स्कूलचे मंगल आव्हाड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

खासगी शाळांमध्ये निगडी येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा प्राथमिक शाळेच्या लीना मोहिते, जैन विद्या प्रसारक मंडळ संचालित श्री गुरुमैय्या प्रभाकंवरजी प्राथमिक विद्या मंदिरच्या कविता वाल्हे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संचालित जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मयुरी मुळूक, बोपखेल येथील आकांक्षा संचालित पीसीएमसी इंग्रजी माध्यम शाळेच्या राहुल लोखंडे हे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी ठरले.

रुपीनगर येथील उर्दू प्राथमिक विभागाच्या पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या शाहीन शेख, चिंचवड येथील उर्दू प्राथमिक विभागाच्या पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या यास्मिन इरफान खान, क्रीडाशिक्षक प्रशांत उबाळे, वडमुखवाडी येथील प्राथमिक विभागाच्या पीसीएमसी पब्लिक स्कूलच्या रुपाली गरुड यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात भाटनगर येथील शाळेतील विद्यार्थिनींनी गुरुवंदना सादर केली. तसेच काही शिक्षकांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाटक आणि नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे आभार विजयकुमार थोरात यांनी मानले. प्रास्ताविक संगीता बांगर यांनी केले तर सूत्रसंचालन गणेश लिंगडे आणि चारुशीला फुगे यांनी केले.

youtube.com/watch?v=Y0ItMrTfHKo