Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट


एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात पिंपरी चिंचवड शहरात वाहतूक कोंडीचे 25 हॉटस्पॉट निदर्शनास आले आहेत. वाहतूक कोंडी होणाऱ्या 25 ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्याबाबत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आदेश दिले आहेत.

औद्योगिक वसाहतींमुळे वेगाने वाढणारे शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराची ओळख तयार होत आहे. शहरात शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि मिळेल त्या कामाच्या निमित्ताने येणाऱ्या लोकांसह सुमारे 40 लाख लोकांचा राबता आहे. शहरात लाखो वाहने दररोज रस्त्यावर धावतात. औद्योगिक परिसरामुळे अवजड वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात होते.

हिंजवडी, तळवडे, वाकड, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, सांगवी, निगडी, पिंपरी, चिंचवड, भोसरी परिसरात सकाळी आणि सायंकाळी पीक अवर मध्ये सर्वाधिक वाहतूक कोंडी होते. अरुंद रस्ते, पदपथावरील अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे, बेशिस्त पार्किंग अशा अनेक कारणांमुळे वाहतूक कोंडी होत आहे.

Pimpri : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला मारहाण 

औद्योगिक वसाहती, आयटी पार्क, शैक्षणिक संस्था, मॉल्स आणि इतर सुविधांमुळे शहराची लोकसंख्या वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे शहरातील पायाभूत सुविधांवर ताण येतो. मागील काही वर्षांत शहरात वाहतूक कोंडीची समस्या वाढू लागली आहे. पिंपरी चिंचवड शहर हे नियोजित शहर असल्याचे म्हटले जात असेल तरी नियोजनाअभावी वाहतूक कोंडी होत आहे.

दरम्यान, पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस, पिंपरी चिंचवड महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले. ही ठिकाणे शोधून त्याबाबत उपाययोजना करण्याचे पिंपरी चिंचवड वाहतूक पोलिसांनी योजिले आहे.

शहरातील वाहतूक कोंडी होणारी ठिकाणे –

मुकाई चौक, गोडाऊन चौक, फिनोलेक्स चौक, भारत माता चौक, खंडोबा माळ चौक, बोऱ्हाडेवस्ती चौक, त्रिवेणीनगर चौक, नाशिक फाटा, लक्ष्मी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी चौक, भुजबळ चौक, ताथवडे अंडरपास, काळा खडक रोड, तळवडे चौक, भुमकर चौक, फिनिक्स मॉल परिसर, काशीद पार्क, भोसरी बस स्टँड, पुनावळे ब्रीज अंडरपास, चिखली चौक, देहू फाटा, टिळक ब्रीज, दापोडी मेट्रो स्टेशन, गणेशनगर चौक, डांगे चौक.