एमपीसी न्यूज – नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यासाठी(PCMC) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने ‘कॉफी विथ कमिशनर’ या महत्वाकांक्षी उपक्रमाचा आज शुभारंभ झाला.
‘नवी दिशा’ उपक्रमाअंतर्गत शहरातील तळागळातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी तसेच त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सामुदायिक शौचालयांच्या देखभालीचे काम देण्यात आले आहे. त्यातील विविध स्वयं-सहायता महिला बचत गटातील महिलांना थेट आयुक्त शेखर सिंह यांच्याशी संवाद साधण्यासाठी, त्यांची आव्हाने आणि सामुदायिक शौचालय देखभालीच्या कामाबाबत अभिप्राय देण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याच्या अनुषंगाने ‘’कॉफी विथ कमिशनर’’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. चिंचवड येथील ऑटोक्लस्टर कार्यालयात आयुक्त शेखर सिंह यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा आज शुभारंभ झाला.
Alandi : भांडणाच्या रागात महिलेने केला इंद्रायणी नदीत जीव देण्याचा प्रयत्न; तरुणाच्या प्रसंगवधानाने वाचले प्राण
‘कॉफी विथ कमिशनर’ च्या माध्यमातून या उपक्रमातील महिलांना त्यांच्या समस्या आणि आव्हाने मांडण्यासाठी थेट व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भविष्यात महापालिका या महिलांना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या आणखी सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यावर भर देणार आहे. ज्यामध्ये आरोग्य विभागामार्फत सामुदायिक शौचालयांच्या परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून तेथील सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.
आज झालेल्या कॉफी विथ कमिशनरच्या पहिल्या बैठकीत शहरातील ‘अ’ आणि ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयनिहाय सामुदायिक शौचालय देखभाल या कामाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नवी दिशा उपक्रमामध्ये भविष्यातील संधी, आव्हाने आणि अनुभवांबद्दल आयुक्त शेखर सिंह यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली.
नवी दिशा उपक्रमाने आम्हाला वेगळी ओळख निर्माण करून दिली. आयुक्त यांची भेट घेतल्याने आम्हाला प्रत्यक्ष समस्या, अभिप्राय आणि सूचना त्यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळाली. आम्हाला खात्री आहे की, महापालिका आमच्या सूचनांवर विचार करेल. तसेच अशा उपक्रमांमुळे नवी दिशा उपक्रमातील महिला बचत गटांचा प्रशासनातील सहभाग वाढविण्यास नक्कीच मदत मिळेल.
– लता रोकडे, भरारी महिला बहुउद्देशीय मंडळ, बलदेव नगर, पिंपरी
सामुदायिक शौचालये चालवणे आणि त्यांची देखभाल करणे सोपे काम नाही. परंतु प्रशासनाच्या पाठिंब्यामुळे हे काम शक्य होत असून आम्हाला उत्साहाने काम करण्यास ऊर्जा मिळत आहे. यापुढेही हा पाठिंबा असाच राहील असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला असून यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो.
– राजश्री वेताळे, ऐश्वर्या महिला बचत गट, विद्यानगर, चिंचवड, पुणे
महिन्यातून दोनवेळा ‘’कॉफी विथ कमिशनर’’ उपक्रमाचे आयोजन
महापालिकेच्या वतीने महिन्यातून दोनवेळा “कॉफी विथ कमिशनर” या उपक्रमाचे आयोजन केले जाणार असून विविध क्षेत्रीय कार्यालयांतील महिला गटांना आयुक्तांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. या उपक्रमाचा उद्देश प्रशासकीय कामकाजात नवी दिशा प्रकल्पातील महिलांचा सहभाग वाढविणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रेरणा देणे हा आहे.