PCMC : माेबदला दिला तरच मेट्राेला कायमस्वरूपी जागा देऊ; महापालिकेचे शासनाला पत्र


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील अतिशय मोक्याच्या 10 ठिकाणच्या जागा पुणे मेट्राेसाठी 30 वर्षाच्या भाडेपट्टयाने हस्तांतरीत ( PCMC) केल्या आहेत. मात्र, महामेट्राेची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता वाढविण्याच्या दृष्टीने, तिकीटेत्तर उत्पन वाढविण्यासाठी महापालिकेने दिलेल्या जागांचा वापर वाणिज्य करण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी महापालिकेने या जागा मेट्राेला मालकी हक्काने व बिनशर्त द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने महापालिका आयुक्तांना दिल्या हाेत्या. मात्र, या जागा मेट्राेला देण्यासाठी त्याचा याेग्य ताे माेबदला द्यावा लागेल, असे पत्र महापालिका प्रशासनाने राज्य सरकारला दिले आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात दापाेडी ते पिंपरी या 7.5 किलाेमीटर अंतरावर मेट्राे धावत आहे. दुस-या टप्यातील पिंपरी ते निगडी या मार्गाचे कामकाज नुकतेच सुरू करण्यात आले आहे. यासाठीचा पहिला पिलर निगडीत उभारण्यात येणार आहे. या मार्गासाठीही मेट्राेला महापालिकेकडून 4 हजार 884 चाैरस मीटरच्या 15 जागांची आवश्यकता आहे. तसेच याही जागा कायमस्वरूपी द्याव्यात, असा मेट्राे प्रशासनाचा आगृह आहे.

Today’s Horoscope 20 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मेट्राेला 2018 मध्ये महापालिकेने मेट्राेच्या प्रवाशांच्या पार्किंगसह इतर कामांसाठी शहरातील महत्वाच्या 10  ठिकाणच्या जागा 30 वर्षाच्या ( PCMC) भाडेपट्टयाने दिल्या आहेत. मात्र, आता महापालिकेच्या या जागांवर मेट्रो आणि राज्य सरकारची वर्कदृष्टी पडली आहे. मेट्राे प्रकल्प वित्तीयदृष्ट्या सक्षम करण्यासाठीचे मदत करणे आवश्यक आहे. यासाठी मेट्राेला दिलेल्या जागांचा वापर वाणिज्य विकास करून त्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याचे शासनाचे म्हणणे आहे. मात्र, महापालिकेने 30 वर्षासाठी जागा दिल्याने त्याचा वाणिज्य वापर करण्यास अडचणी येत आहेत. याचाच विचार करून राज्य शासनाने आता महा मेट्राेची स्थिरता व वित्तीय व्यवहार्यता वाढविण्याच्या दृष्टीने तिकिटेत्तर उत्पन्न वाढविण्यासाठी  मेट्राेला वाणिज्य वापराला कायमस्वरूपी देण्याची सूचना महापालिकेला केली हाेती.

याबाबतचे पत्र राज्य सरकारच्या नगर विकास विभागाच्या उपसचिव विद्या हम्पय्या यांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना दिले हाेते. मात्र, महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभागाने मेट्राेला या दहा ठिकाणच्या जागा कायमस्वरूपी विना माेबादला देता येणार नाही. जागा पाहिजे असल्यास त्याचा याेग्य ताे माेबादला द्यावा लागेल, असे पत्र पाठविल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

‘ही’ आहेत जागेची ठिकाणे

महापालिका कार्यालयासमाेरील पार्किंग आरक्षण क्रं. 115, वल्लभनगर एसटी डेपाे आरक्षण क्र.112, फुगेवाडी जकात नाक्याची जागा, महापालिका प्रवेशव्दारालगत, दापाेडीतील सुविधा भूखंड, फुगेवाडीतील  लाेकमान्य टिळक, मिनाताई बाळासाहेब ठाकरे प्राथमिक शाळेची जागा, तिरंगा हाॅटेलच्या पाठीमागील सुविधा भूखंड, वल्लभनगर येथील जागा या महत्वाच्या ठिकाणच्या माेकळ्या जागा मेट्राेला ( PCMC) हव्या आहेत.