एमपीसी न्यूज – गेल्या काही काळात देशातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये अल्पवयीन (PCMC)मुला-मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. बदलापूर पूर्वेतील शाळेत घडलेली घटना याचेच एक उदाहरण आहे. ही घटना खूपच धक्कादायक आहे आणि समाजासाठी चिंतेची बाब आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची प्राथमिक जबाबदारी आहे. यासाठी कठोर उपाययोजना तातडीने करणे आवश्यक आहे. 10 मार्च 2022 च्या शासन परिपत्रकानुसार शाळेमध्ये ‘सखी सावित्री’ समिती गठीत करण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे यांनी संस्थाचालकांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
बदलापूर येथील एका नामांकित शाळेत शिशुवर्गात शिकणाऱ्या साडेतीन वर्षांच्या दोन मुली शाळेत लघुशंकेसाठी जात होत्या. त्यावेळी शाळेतीलच एका कर्मचाऱ्याने या दोघींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार नुकताच समोर आला. या घटनेबद्दल संताप व्यक्त करत सिमा सावळे यांनी म्हटले आहे की, “अशा प्रकारच्या घटनांमुळे पालकांमध्ये एक भीतीचे वातावरण निर्माण होते आणि ते विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास घाबरतात. शाळा ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी एक पवित्र स्थळ असते, परंतु अशा प्रकारच्या घटनांमुळे ही पवित्रता नष्ट होत चालली आहे. बाल हक्क सुरक्षा कायद्यांतर्गत बालकांच्याच हिताचे / हक्कांचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनाचे शालेय व क्रीडा शिक्षण विभागाने 10 मार्च 2022 रोजी एक परिपत्रक काढले आहे. त्या अन्वये राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप आणि समतामुलक वातावरण निर्मितीसाठी विविध स्तरावर ‘सखी सावित्री’ समिती गठित करणेबाबत आदेश दिले आहेत. परंतु प्रत्यक्षात शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही हे अत्यंत खेदजनक आहे.”
Alandi : भांडणाच्या रागात महिलेने केला इंद्रायणी नदीत जीव देण्याचा प्रयत्न; तरुणाच्या प्रसंगवधानाने वाचले प्राण
शालेय विद्यार्थ्यांच्यावर होणारे लैगिक अत्याचार रोखण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी काही महत्वाच्या उपाययोजना राबविणे गरजेचे, असे मत सिमा सावळे यांनी व्यक्त केले. संस्थेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पोलिस व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचे नियमित निरीक्षण करणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक शाळेत मुला-मुलींच्या सुरक्षेसाठी एक प्रभावी सुरक्षा यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. यात CCTV कॅमेरे लावणे, सुरक्षारक्षक नियुक्त करणे आणि विद्यार्थ्यांना लैंगिक शोषणाविषयी जागरूक करणे यासारखे उपाय महत्वाचे आहे. शाळेत एक प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारची तक्रार आल्यास त्याची त्वरित दखल घेतली जावी आणि दोषी व्यक्तीवर कारवाई केली जावी. शाळेने पालकांशी नियमित संपर्क साधला पाहिजे आणि मुलांशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास त्यांच्याशी चर्चा करावी, अशी आग्रही मागणी सिमा सावळे यांनी विविध संस्थांकडे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
शैक्षणिक संस्थांनी शासनाच्या आदेशानुसार आपल्या शाळेमध्ये ‘सखी सावित्री’ समिती ताडीने गठीत करावी. तसेच शैक्षणिक संस्थांनी विविध उपाययोजना राबवून मुला-मुलींच्या सुरक्षेची हमी द्यावी. जिजाई प्रतिष्ठान अशा शैक्षणिक संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करण्यास तयार असल्याची ग्वाही देखील सिमा सावळे यांनी यावेळी दिली. विविध शाळांतून मुख्याध्यापकांना पत्र देताना सिमा सावळे यांच्याबरोबर माजी नगरसेविका आशा धायगुडे-शेंडगे या सहभागी होत्या.