एमपीसी न्यूज – श्रावण वद्य अष्टमी अर्थात श्रीकृष्ण जन्माष्टमी. (Pimpri)ही तिथी अखिल मानव जातीला गीतारुपी ज्ञानाचा अमूल्य ठेवा प्रदान करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला ती तिथी! या खास दिनाच्या निमित्ताने गीता आश्रमात विशेष सजावट करण्यात आली होती.
यंदा जन्माष्टमीच्या प्रातःकाळच्या मंगलपर्वाची सुरुवात गीता आश्रमाशी संलग्न असलेल्या पिंपरी स्थित ‘गुरुकुल’ येथे “हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे” या महामंत्राच्या जपाने करण्यात आली.वंदनीय गुरुदेव ’पद्मनाभन कृष्णदासा’ यांच्या दिव्य दर्शनाने धन्य झालेल्या बहुसंख्य भाविकांना जन्माष्टमीच्या शुभ प्रसंगी विशेष धागा व प्रसाद गुरुंच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सायंकाळच्या वेळी गीता आश्रमामध्ये जन्माष्टमी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा आरंभ पूजा, अर्चना व अभिषेकाने झाला. यानंतर बहुल संख्येने उपस्थित असलेल्या भक्तगणांनी विष्णु-सहस्रनामाचे पठण केले. जन्माष्टमी विशेष आध्यात्मिक प्रवचनातून श्रीकृष्ण अवताराचे महत्त्व विशद करून भाविकांना दैनंदिन जीवनात उपयुक्त अशी विविध आध्यात्मिक तत्वे सुगम रीतीने कथन करण्यात आली. या वेळी झालेल्या भजनाच्या कार्यक्रमाने कृष्णमय झालेल्या वातावरणाने भाविक भक्तिरसात चिंब भिजून गेले.
Chinchwad : श्री स्वामी समर्थ मंदिरात दहीहंडी साजरी
जन्माष्टमीचे खास औचित्य साधून ‘गीता आश्रम भजन संघा’द्वारे सुश्राव्य असे राधे गोविंदा… हे नवे भजन गीता आश्रमाच्या यू ट्यूब वाहिनीवर (चॅनल) व अन्य सामाजिक माध्यमांच्या मंचावर (सोशल मीडियावर) प्रसृत करण्यात आले आहे.
अशाप्रकारे, अत्यंत उत्साहपूर्ण व भक्तीमय वातावरणात गीता आश्रमामध्ये पार पडलेल्या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाची सांगता, मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या भाविकांना केलेल्या प्रसाद वाटपाने झाली.
पूजनीय गुरुदेव श्री.’पद्मनाभन कृष्णदासा’ यांच्या निकटवर्तीय भक्तांनी 1998 साली स्थापन केलेल्या ‘नरसेवा नारायणसेवा’ अशी गुरुजींची शिकवण असलेल्या ‘गीता आश्रम’ या धर्मादाय संस्थेमध्ये (चॅरिटेबल) विविध प्रकारचे उपक्रम उदाहरणार्थ, आध्यात्मिक व ज्योतिषशास्त्र विषयक मार्गदर्शन, योगवर्ग, ध्यानधारणा, संस्कृत भाषेचे वर्ग इत्यादी निःशुल्क चालविले जातात.