एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील शासकीय व (Pimpri )खासगी शाळांमध्ये ‘सुरक्षा ऑडीट’ करण्याबाबत नियमावली तयार करण्यात येणार आहे. तसेच, शाळांना मान्यता देताना सुरक्षाबाबत नियमावली व कडक अंमलबजावणी करण्याबाबत ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. याबाबत शिक्षण विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली.
बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच निगडीत असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका शाळेतील तेरा वर्षांच्या मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी संबंधित शिक्षकाला निगडी पोलिसांनी गजाआड केले आहे. तसेच, पूर्वी अशा प्रकारचा गुन्हा केल्यानंतर पुन्हा त्याला शाळेत घेतल्याप्रकरणी शाळेच्या प्राचार्यासह ट्रस्टचा अध्यक्ष आणि इतरांनाही पोलिसांनी अटक केली आहे.
Pimpri : संत तुकारामनगर येथील म्हाडा वसातीमधील समस्या सोडवा; यशवंत भोसले यांची शिवाजीराव आढळराव यांच्याकडे मागणी
या पार्श्वभूमीवर भाजपा आमदार महेश लांडगे यांनी शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यावरील सतर्कता याबाबत पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय परीमंडळ- 1च्या पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, महानगरपालिका शिक्षण विभागाचे विजय थोरात, शिक्षणाधिकारी संगीता बाबर आदी उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हा परिषदेकडून महानगरपालिका व खासगी शाळांचे सुरक्षाबाबत ऑडीट करावे. त्यानुसार अ-ब-क-ड अशी श्रेणी तयार करावी. शाळांना मान्यता देताना सीसीटीव्ही, शौचालये आदी सुरक्षेबाबत नियमावली तयार करावी. तसेच विद्यार्थी सुरक्षाबाबत पोलीस प्रशासनानेही कडक नियमावली तयार करावी. त्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करावा, अशी सूचना आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षाबाबत पोलीस प्रशासन, शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी एकत्रितपणे ‘ॲक्शन प्लॅन’ करावा. निगडी प्रकरणातील आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अधिकाऱ्यांना केली आहे. तसेच, आगामी काळात शहरातील शासकीय व खासगी शाळांमध्ये असे प्रकार घडू नयेत. यासाठी कडक नियमावली करावी, अशी सूचना केली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये अशा घटना घडू नयेत. यासाठी सर्व शहरावासी, संस्थाचालक आणि पालकांनी सतर्क राहीले पाहिजे, असे आवाहन आहे.
महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.