Pimpri : दोन आठवड्यानंतरही निळ्या पूररेषा सर्वेक्षण सुरूच


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील पवना, मुळा, (Pimpri) इंद्रायणी नद्यांच्या पूररेषेत बांधकामे उभारल्याने थोड्या पावसानेही पूर येत असल्याने निळ्या पूररेषेतील बांधकामांचे सर्वेक्षण करून यावर आठ दिवसात कारवाई करण्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले हाेते. मात्र, दोन आठवडे उलटून गेले तरीही सर्वेक्षण सुरूच आहे. सुमारे 60 टक्के सर्वेक्षण झाल्याचे अधिकारी सांगत आहेत.

शहरात लोकसंख्यावाढ होऊ लागल्याने अनेक भागांत पुनर्विकास होत आहे. चाळी, बैठी घरे, झोपडपट्टी, बंगले तोडून टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. परंतु, त्या भागातील ड्रेनेजलाइन जुन्या व कमी क्षमतेच्या असल्याने सांडपाणी तिपटीने वाढून त्या वारंवार तुंबत आहेत. नदीपात्रातील पूररेषेत बांधकामे वाढल्याने पूरस्थिती उ‌द्भवत आहे, असे सांगत सर्वेक्षण करून कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले होते.

Pune : नृत्य सादरीकरणातून रोहिणी भाटे यांना गुरुवंदना

नैसर्गिक ओढे, नाल्यांवर अतिक्रमण झाले आहे. काही बिल्डरांनी नाले बुजवून कमी व्यासाच्या वाहिन्या टाकल्या आहेत. त्यामुळे (Pimpri) पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होऊन रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचून राहत आहे. आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रत्येकी एक ओढा व नाल्यावरील अतिक्रमण व बांधकामे काढण्यात येणार आहेत. सर्वेक्षण सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पुराच्या पार्श्वभूमीवर नदीपात्रातील निळ्या पूररेषेतील सर्व बांधकामे पाडण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले. 60 टक्के सर्वेक्षण झाले असून, लवकरच कारवाईला सुरुवात करण्यात येणार असल्याचे उपायुक्त मनोज लोणकर यांनी सांगितले.