Pimpri : बाप्पा मोरयाचा जयघोषाने दुमदुमले पिंपरी-चिंचवड शहर


एमपीसी न्यूज – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, असा जयघोष करत (Pimpri) अमाप उत्साह, ढोल ताशांचा दणदणाट, बाप्पाच्या मूर्तीवर फुलांची उधळण करत जल्लोषपूर्ण वातावरणात बाप्पाचे पारंपरिक थाटात श्री गणराचे स्वागत करण्यात आले. छोट्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. बाप्पा मोरयाच्या जयघोषाने शहर दुमदुमले. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी विधीवत पूजा करत मोदकाचा नैवेद्य अर्पण करून मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

राज्यासह संपूर्ण देशभरात आजपासून गणेशोत्सव उत्सवास सुरवात झाली. पिंपरी-चिंचवड शहरासह उपनगरांमध्येही गणेश चतुर्थींच्या मंगलमय मुहूर्तावर गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. गणेशमूर्ती मुहूर्तावर घरी आणण्यासाठी अबालवृद्धांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. शहर आणि उपनगरांमध्ये मूर्ती घरी नेण्याचा तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या उत्साह पाहायला मिळत होता. आरती, स्तोत्र आणि मंत्रपठण असे मंगलदायक वातावरण प्रत्येक घरात पाहायला मिळाले. बाप्पा घरी आल्याने बच्चे कंपनी आनंदाने हरखून गेले होती. मूर्तीची विधीवत प्रतिष्ठापना करून मोदकाच्या प्रसादाचे वाटप करण्यात आले. गणेशोत्सवामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

PMPML News : गणेशोत्सवात पीएमपीएमएल कडून रात्रभर बस सोडण्याचे नियोजन

कपाळावर “गणपती बाप्पा मोरया’ची फीत बांधून, हातात छोटे ढोल ताशा घेऊन गणेश मूर्ती नेण्याची लहानग्यांचीही मध्येच लुडबूड सुरू होती. ढोल ताशांच्या निनादात लहानग्यांचा उत्साह शिगेला पोहचला होता. बाप्पा मोरयाच्या घोषणा देत आपल्या आवडत्या मूर्ती (Pimpri) घरी नेण्यासाठी त्यांची लगबग सुरू होती. गणरायाच्या आगमनाच्या घोषणा देत असलेल्या छोट्या गणेशभक्‍तांचेही रूप पहाण्यासारखे होते. त्यामुळे परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळाले

गेला महिनाभर आतुरतेनी वाट पाहत असलेले व तयारी करत असलेल्या सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाचे पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्‍तीमय वातावरणात प्राणपतिष्ठा करण्यात आली. गणरायाची मूर्ती मंडपात विधीवत पूजा करून प्रतिष्ठापना करण्यात आली. मंडळातील कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून तयारीमध्ये गुंतले होते. त्यामुळे गणरायाचे आगमन होताच “बाप्पा मोरया’चा जयघोष करत गणेश भक्तांमध्ये नवचैतन्य पसरले होते.

पारंपरिक वाद्याचा वापर; पर्यावरण मूर्तीला प्राधान्य

“गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष करत, पारंपरिक वाद्यवृंद, ढोल-ताशांचा दणदणाट, फुलांची उधळण करत मोठ्या थाटात गणरायाचे आगमन झाले. गणेश मूर्ती ही पर्यावरण पूरक असावी यासाठी प्राधान्य देण्यात आले होते. तर, मूर्ती घरी नेण्यासाठी पारंपरिक ढोल ताशा आणि इतर वाद्यांचा वापर करण्यात आला होता. ढोल ताशांच्या दणदणाटाने वातावरण मंगलमय झाले होते.

गणरायाच्या स्वागतासाठी दुचाकी, चारचाकी, टेम्पो यांसह विविध वाहनांचा वापर करण्यात आला. आधीच बुक केलेल्या मूर्ती घरी नेण्यासाठी भाविकांची स्टॉलच्या ठिकाणी रांगा लागल्या होत्या. हार, फुले, पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. त्यामुळे रस्ते गर्दीने फुलले होते. मोठा जयघोष करत मूर्ती घरी घेऊन जणाऱ्यांच्या रस्त्यावर रांगा होत्या.