Pimpri : सणासुदीच्या काळात अखंड वीज पुरवठ्यासाठी ‘महावितरण’ने दक्षता घ्यावी – खासदार बारणे


एमपीसी न्यूज – गणेशोत्सव व पुढील (Pimpri) सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) केली.

पिंपरी-चिंचवड शहरातील वीज पुरवठा सुरळीत होण्याकरिता पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालय येथे खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. त्या वेळी ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता शहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वासराव भोसले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता सांगवी विभाग कल्याण गिरी, अतिरिक्त अभियंता खराडी विभाग भुजंग पवार, कार्यकारी अभियंता भोसरी विभाग अतुल देवकर, सहाय्यक कार्यकारी अभियंता किरण सरोदे, सहाय्यक कार्यकारी अभियंता रत्नदीप काळे, सहाय्यक कार्यकारी अभियंता संतोष झोडगे, सहाय्यक कार्यकारी अभियंता विनोद वाघामारे, माजी नगरसेवक संदीप वाघेरे, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पांढरकर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे, जितेंद्र ननावरे, युवासेना जिल्हाप्रमुख, राजेंद्र तरस, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, महिला शहर संघटिका सारीताताई साने, निखील येवले, हेमचंद्र जावळे आदी उपस्थित होते.

गेले कित्येक दिवसात पिंपरी- चिंचवड शहरात विजेचा लपंडाव सुरू असल्याबद्दल खासदार बारणे यांनी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. पावसाळा असल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत होता, असे स्पष्टीकरण यावेळी अधिकाऱ्यांनी दिले. गणेशोत्सव व सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याबाबत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना बजावले.

वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याबरोबरच महावितरण कार्यालयात फोन उचलला नाही. कर्मचाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद मिळत नाही, अशा नागरिकांच्या तक्रारी असून यापुढे हे सहन केले जाणार नाही, असा इशाराही खासदार बारणे यांनी दिला.

पुनावळे, ताथवडे, रावेत, वाकड या झपाट्याने वाढणाऱ्या (Pimpri) भागासाठी नवीन सब स्टेशन सुरू करणे, ट्रान्सफार्मरची संख्या वाढवणे, जादा कर्मचारी उपलब्ध होणे आदी विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. त्यासाठी महावितरण ला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.

केंद्र शासनाच्या योजना विषयी जनजागृती करा – बारणे

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह विविध ग्राहकोपयोगी योजना समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचविण्यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, अशी सूचना खासदार बारणे यांनी केली. प्रधानमंत्री सूर्यघर (Pimpri) मोफत वीज योजनेअंतर्गत ग्राहकांना मोफत वीज मिळण्याबरोबरच, वीज विक्रीतून उत्पन्नाचे साधनही मिळणार आहे. एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये तर तीन किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त प्रकल्पासाठी 78 हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येते. गृहनिर्माण सोसायट्या व गृह संकुलांसाठी 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते, अशी माहिती बारणे यांनी यावेळी दिली.

youtube.com/watch?v=IOYZxQkal4M