एमपीसी न्यूज – आचार्य श्री.पद्मनाभन कृष्णदासा यांच्या आशीर्वाद व प्रोत्साहनाने स्थापन झालेल्या व ज्येष्ठ अध्यापक श्री.अजित मेनन यांचे समर्थ मार्गदर्शन लाभलेल्या पिंपरी, पुणे येथील ‘गुरुकुल संस्कृत अकॅडेमी संस्थेमध्ये श्रावणी पौर्णिमेला प्रतिवर्षी आयोजित करण्यात येत असलेला आंतरराष्ट्रीय संस्कृत दिन यंदाही अत्यंत उत्साहात पार पडला.गीता आश्रम या संस्थेशी संलग्न असलेल्या गुरुकुल संस्कृत अकॅडेमी संस्थेमध्ये, १९ ऑगस्ट रोजी साजरा झालेल्या, आंतरराष्ट्रीय संस्कृत दिनाच्या कार्यक्रमाचा शुभारंभ गुरुजनांचा सत्कार करुन झाला.संस्कृतचे अध्ययन करणाऱ्या गुरुकुल संस्कृत अकॅडेमी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन संस्कृत भाषेत रचलेले लघु नाटिका, गीत गायन, कथाकथन, सुभाषिते, लघुसंभाषण इत्यादी वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गणेश वंदनेने व श्रीकृष्ण स्तुतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.अध्यापक श्री.अजित मेनन ह्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात भाषाजगतातील संस्कृत भाषेचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान व महत्त्व विशद केले.’मम दोषः नास्ति’ या लघु नाटिकेने कर्माचे महत्त्व अधोरेखित केले. तर ह्या कलियुगात भगवान श्रीकृष्ण आध्यात्मिक गुरुंच्या माध्यमातून कसे प्रकट होतात हे ‘संभावामि युगे युगे’ ह्या नाटिकेने उत्तमरीत्या दर्शविले.‘गुरोः दिव्यदृष्टि:’ नाटिकेने आध्यात्मिक गुरुंच्या ठायी असणारी सत्य जाणणारी त्रिकालदर्शी दिव्य दृष्टी भक्तगणांसाठी कशी लाभदायी ठरते हे प्रभावीपणे मांडले. ‘यदा शठश्च महाशठश्च नाटिकेत एका महाधूर्त द्वयीमधील चतुरतेने रंगत जाणारे डाव-प्रतिडाव उत्कंठावर्धक होते.’अलसा शिष्या’ नाटिकेने गुरुआज्ञापालनाचे तत्व बिंबवले. या व्यतिरिक्त ‘ज्ञानी कः’ ही नाटिका तसेच श्रीनरसिंहस्तोत्राचे गायन,रामायणाचा अंतरार्थ, ‘कर्म सिद्धांत’ ही कथा, मनुष्याचे कर्म त्याच्या प्रगती वा अधोगतीला कारणीभूत ठरते या आशयाच्या सुभाषिताचे सादरीकरण अशा आध्यात्मिक व रोचक वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल होती.
Talegaon : कलापिनी व साने गुरुजी कथामाला आणि समर्थ सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मनाचे श्लोक पांठातर स्पर्धा उत्साहात संपन्न
कार्यक्रमाच्या दरम्यान संस्कृत भाषेला’देवभाषा’ असे का संबोधले जाते, हे अत्यंत सुगम व सुंदर प्रकारे कथन केले गेले.
कन्नड,तेलुगु,मल्याळी,हिंदी असे विविध प्रांतीय तसेच विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असलेल्यांपासून ते अगदी शालेय गटातील विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांचा सहभाग हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य होते.
गुरुदेव श्री. ‘पद्मनाभन कृष्णदासा’ यांची विशेष उपस्थिती या संस्कृत महोत्सवास लाभली.बहुसंख्येने उपस्थित असलेल्या निमंत्रितांना अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
प्राचीन व दिव्य अशा संस्कृत भाषेचा प्रसार व प्रचार हे उद्दिष्ट असलेल्या ‘गुरुकुल संस्कृत अकॅडेमी’ या संस्थेमार्फत संस्कृत भाषेचे वर्ग निःशुल्क चालविले जात असून ते सर्वांसाठी खुले आहेत.