एमपीसी न्यूज : “वारकरी संप्रदायात धर्मांध (Pune) लोकांचा वावर वाढल्याने समाजात कटुता निर्माण होत आहे. ही कटुता संपवून सामाजिक ऐक्य, एकसंध समाज घडवायचा असेल, तर आध्यात्मिक व वारकरी संप्रदायात कार्यरत लोकांनी सक्रिय व्हावे लागेल. तरुण पिढीला विधायक विचार देऊन त्यांची वैचारिक जडणघडण करण्यात संत विचारांच्या मंडळींनी पुढाकार घ्यावा,” असे आवाहन देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांनी केले. मीही वैष्णव विचारांचा असून, पांडुरंगाचे दर्शन घेतो. मात्र, त्याचा फारसा गाजावाजा करत नाही, अशी टिपण्णीही त्यांनी केली.
राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीच्या वतीने शुभारंभ लॉन्स येथे आयोजित पहिल्या वारकरी संमेलनाच्या समारोपावेळी शरद पवार बोलत होते. यावेळी संमेलनाध्यक्ष व संत तुकाराम महाराज संस्थान देहूचे माजी अध्यक्ष हभप बापूसाहेब महाराज देहूकर, स्वागताध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, हभप भारत महाराज जाधव, हभप राजेंद्र येप्रे महाराज, राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल (आबा) महाराज मोरे, राज्य उपाध्यक्ष हभप मुबारक महाराज शेख, हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे आदी उपस्थित होते. या संमेलनात राज्यभरातून वारकरी सहभागी झाले होते. यावेळी दिंडी सोहळ्याकरिता भजन साहित्य, तसेच वारकरी संप्रदायातील योगदानाबद्दल पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
शरद पवार म्हणाले, “समाजमन पुरोगामी विचारांवर आधारित असावे. कर्मकांड, रूढी परंपरा याविरोधात भूमिका घेण्याची गरज आहे. मात्र, वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक आघाडीच्या नावाने काम करणारे अनेक लोक ठराविक भूमिकेतून विचार मांडण्यावर भर देत आहेत. त्यातून जाती-धर्मात तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे सुसंवाद करण्याची गरज मला नेहमी वाटते. चुकीच्या गोष्टीना खतपाणी घालणाऱ्यांना (Pune) संप्रदायाने दूर ठेवले पाहिजे. आपल्या विचारांची व्यापकता वाढवून अशा प्रवृत्तींना आळा घालण्याचे काम केले पाहिजे. ढोंगी राजकारण, समाजकारण करणाऱ्यांना योग्यवेळी चोप देण्याचे काम संताच्या विचारांनी केले आहे. त्याच विचारावर आधारित सामंजस, मैत्रीपूर्ण समाज घडवणे आवश्यक आहे.”
“माझ्याविषयी अनेकदा आस्तिक की नास्तिक असा वाद रंगवला जातो. मात्र, सर्वधर्म समभावाचा विचार देणाऱ्या वारकरी संप्रदाय मी मानतो. पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेतो; फक्त दर्शन घेताना त्याचा गाजावाजा करत नाही. माझ्या अंतःकरणात पांडुरंगाचा, ज्ञानोबा-तुकोबाचा विचार असतो. त्यामुळे मानसिक समाधान मिळत राहते. वारकऱ्यांच्या व्यासपीठावर येणार म्हणल्यावर काही लोकांच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. मला पोलिसांचा फोन आला. परंतु, वारकरी संप्रदायाचा विधायक विचार जतन करावा आणि नवीन पिढीत तो रुजावा, यासाठी वारकऱ्यांसोबत ताकदीने उभा राहणार असल्याचे त्यांना कळवले,” असेही शरद पवार यांनी नमूद केले.
जयंत पाटील म्हणाले, “राज्यात वैचारिक अतिक्रमण होत आहे. हे थांबवण्यासाठी वारकऱ्यांनी एकत्रितपणे चांगले काम करावे. धर्मात आणि जातींमध्ये तेढ निर्माण करणारे लोक नव्या पिढीला भरकटवण्याचा प्रयत्न करत आहेत. या पिढीला ज्ञानोबा-तुकोबांचा विचार समजावून सांगायला हवा. दिंडीत लोकांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यात जातीयवादी आणि धर्मांध विचाराचे लोक अधिक आहेत. दिंडीचा उद्देश, हेतू आणि वैचारिक दिशा बदलण्याचे काम काही लोक जाणीवपूर्वक करीत आहेत. अशावेळी मूळ वारकरी संप्रदायाने सामाजिक दृष्टीतून काम करत पुरोगामी विचाराने एकसंध राहण्यासाठी प्रयत्न करावेत.”
संजय आवटे म्हणाले, “पंढरीची वारी समतेचा, श्रद्धेचा विचार आहे. विद्रोह, क्रांती घडविणारे हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांनी बंडखोरी करत अनिष्ट रूढी, परंपराना छेद दिला. ज्ञानोबा-तुकोबांचा हा वारसा सांगताना समतेची (Pune) वाट विस्तारण्याची गरज आहे. त्यासाठी या थोर संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचले पाहिजेत. समतेचा जागर करत माणुसकीचा विचार पेरला पाहिजे. विकृत मानसिकतेला हद्दपार करण्याची क्षमता सहिष्णू वारकरी संप्रदायात आहेत. वारकरी संप्रदायाला गावागावांत ज्ञानोबा-तुकोबा, नामदेव अन जनाबाई पोहोचवावे लागतील.”
Jalgaon : पंतप्रधान मोदी यांनी साधला लखपती दीदींशी संवाद; आर्थिक सक्षमतेबरोबर आत्मसन्मान मिळाल्याची लखपती दीदींची भावना
प्रास्ताविकात आबा महाराज मोरे म्हणाले, “वारकरी संप्रदायात पांडुरंग, तर समाजकार्यात पवार साहेब दैवत आहेत. एक हिंदू गांधीना मानणारा, तर दुसरा हिंदू गांधीना मारणारा आहे. आपल्याला गांधींना मानणाऱ्यांची बाजू घ्यायला हवी. सनातन हिंदू धर्म समजून घ्यायला हवा. आपला वारकरी संप्रदाय वैश्विक विचारांचा, जातीभेदाच्या पलीकडे जाऊन एकात्मतेचा संदेश देतो. वारकरी संप्रदायाचा हाच विचार घेऊन समाजात विवेकाची, सर्व जाती-धर्माच्या एकात्मतेची पेरणी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी आध्यात्मिक व वारकरी आघाडीची स्थापना झाली आहे.”
‘महाराष्ट्राच्या जडणघडणीत वारकरी संप्रदायाचे योगदान’ या विषयावरील परिसंवादात डॉ. रफिक सय्यद, हभप राजेंद्र येप्रे महाराज, हभप बालाजी महाराज जाधव, हभप ज्ञानेश्वर महाराज रक्षक, हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर, हभप ज्योतीताई जाधव महाराज, हभप गणेश महाराज फरताळे यांनी विचार मांडले. हभप श्यामसुंदर महाराज यांनी सूत्रसंचालन केले. हभप मुबारक महाराज शेख यांनी आभार मानले.