Pune : दिवंगत विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहण्याच्या दृष्टीने विशेष लक्ष द्यावे – अजित पवार


एमपीसी न्यूज : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे (Pune) महानगरपालिकेच्या हडपसर येथील राजर्षी शाहू महाराज संकुलामधील दिवंगत विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाला सदिच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी नाट्यगृहाचे सौंदर्य अबाधित राहील यादृष्टीने स्वच्छता, नियमित देखभाल दुरुस्ती याकडे विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, माजी महापौर वैशाली बनकर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, उपायुक्त (सांस्कृतिक) सुनील बल्लाळ, मुख्य अभियंता (भवन) युवराज देशमुख, हडपसर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे पाटील, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक सुनील बनकर आदी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, पुणेकरांना मुळातच नाटकाची आवड आहे. त्यामुळे येरवडा, वडगाव शेरी, पिंपरी- चिंचवड आदी भागांसह हडपसर येथे अद्ययावत नाट्यगृह असण्याची गरज होती. हडपसर येथे दिवंगत विठ्ठलराव तुपे नाट्यगृहाचे काम झाल्यामुळे येथील नाट्यप्रेमी, कलाप्रेमींना लाभ होणार आहे.

यावेळी आयुक्त डॉ. भोसले यांच्याशी चर्चा करताना ज्या इमारती अगदी थोड्या निधीअभावी अपूर्ण आहेत त्या पूर्ण कराव्यात, असे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. यानुसार 22 अपूर्ण इमारतींना प्राधान्याने निधीची तरतूद करुन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.

Chinchwad : पिंपरी चिंचवड शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत नियुक्त्या

नाट्यगृहाचे भाडे 10हजार रुपये ठेवण्याचे नियोजन करण्यात (Pune) आल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यावर नाट्यनिर्माते, दिग्दर्शकांशी बैठक घेऊन महानगरपालिकेलाही परवडेल आणि नाट्यनिर्मात्यांनाही परवडेल असे भाडे निश्चित केल्यास अधिकाधिक नाटकांचे खेळ होऊन महापालिकेला नाट्यगृहाच्या देखभालीसाठी उत्पन्न मिळू शकेल. नाट्यगृहाच्या छतावर सौर पॅनेल बसून वीज निर्मिती करता येईल तथापि, छोट्या आकारात जास्त वीज तयार करणारे अत्याधुनिक सौर पॅनेलचे तंत्रज्ञान येत असल्याने त्यादृष्टीने निर्णय घ्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.