Pune : पुण्यातील 80 बालकलाकारांनी अयोध्येत सादर केले गीतरामायण 


एमपीसी न्यूज – पुण्यातील 80 बाल कलाकारांनी रविवारी (दि. 25) अयोध्या स्थित प्रभु श्रीराम मंदिराच्या प्रांगणात ग दि माडगूळकर व सुधीर फडके रचित गीतरामायण सादर केले. पुणे येथील प्राजक्ता जहागीरदार यांच्या स्वरतरंग संगीत अकादमीतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. पुण्यातील स्वरतरंग संगीत अकादमी तर्फे बाल कलाकारांच्या गटासह होणारा व अयोध्या स्थित श्रीराम मंदिरात होणारा हा गीत रामायणाचा पहिला कार्यक्रम सादर करण्याचा मान पुण्यातील बाल कलाकारांना लाभला.

दोन तासाहून अधिक काळ चाललेल्या या गायन कार्यक्रमात बाल कलाकारांनी गीतरामायणातील निवडक 16 सुमधुर गाणी सादर केली. त्यास उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. साथसंगत व्हायोलिनवर रमाकांत परांजपे, ईरा परांजपे, हार्मोनियमवर जयंत साने व मालती बेहेरे, तबल्यावर अभिजित जायदे, संतोष वैद्य तर तालवाद्यावर प्रसाद भावे यांनी संगत केली.

Maharashtra: माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह सहा जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

कार्यकमास राममंदिर ट्रस्टचे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे, माधुरी आफळे, एल एँड टी मंदिर बांधकाम कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक सतीश चव्हाण, या श्रीराम मंदिर प्रकल्पाचे व्यवस्थाप्रमुख फुलचंद मिश्रा आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. यावेळी बाल कलाकारांचे पालक, महाराष्ट्रातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या प्रसंगी प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी श्रीराममंदिराचा पूर्व इतिहास व उभारणीसंबंधीचे सादरीकरण करून या प्रकल्पाविषयी सर्व माहिती पालक व भाविकांसमोर सविस्तर मांडली. याआधी पुण्यात स्वरतरंग संगीत अकादमी तर्फे गीत रामायण, बालमुखातून स्वातंत्र्यवीर सावरकर अशा विविध विषयावरील सामुहिक सादरीकरणाचे यशस्वी आयोजन केले आहे.