एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या ( Pune ) हस्ते शासकीय विश्रामगृह येथे पूरग्रस्तांना शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मदतीच्या धनादेशाचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले. अनुदानाची रक्कम सर्व कुटुंबांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील सात हजार पेक्षा अधिक कुटुंबांना ही मदत मिळणार आहे.
यावेळी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, उपविभागीय अधिकारी स्नेहा किसवे, यशवंत माने, तहसिलदार किरण सुरवसे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे आदी उपस्थित होते.
नागरिकांनी पूर परिस्थितीत अधिक दक्षता घ्यावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. खडकवासला धरणातून विसर्ग सोडल्यावर नदीपात्रात प्रवाहाला अडथळा येणार नाही यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना श्री.पवार यांनी यावेळी दिल्या.
Pune : पुणे येथील वस्तू व सेवा कर भवनच्या नव्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन
जुलै 2024 मध्ये अतिवृष्टी व वादळवाऱ्यांमुळे जिल्ह्यात अनेक नागरिकांचे नुकसान झाले होते. ज्या घरात पाणी शिरले अशा कुटुंबांना प्रशासनातर्फे मदतीचे वाटप सुरू करण्यात आले आहे. शासनाने विशेष बाब म्हणून प्रती कुटुंब 5 हजारऐवजी 10 हजार रुपये अनुदान देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार पुणे शहरातील 7 हजार 977 कुटुंबांना 7 कोटी 97 लाख 70 हजार, हवेली तालुक्यातील 682 कुटुंबांना 68 लाख 20 हजार, पिंपरी चिंचवड शहरातील 7 हजार 519 कुटुंबांना 7 कोटी 51 लाख 90 हजार आणि मुळशी तालुक्यातील 90 कुटुंबांना 9 लाख रुपये अनुदान देण्यात येत आहे.
याशिवाय विजेचा झटका लागून मयत झालेल्या दोन व्यक्तींच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 10 लाख, तर मुळशी तालुक्यातील आदरवाडी येथे दरड कोसळून मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना ४ लाखाचे अनुदान वितरीत करण्यात आले ( Pune ) आहे.