Talegaon : कलापिनी महिलामंच द्वितीय वर्धापनदिन 2024 व हस्तलिखित प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न


एमपीसी न्यूज : 1 सप्टेंबर हा दिवस कलापिनी (Talegaon) महिला मंचसाठी खूप खास होता. बरोबर दोन वर्षांपूर्वी कलापिनी ह्या संस्थेच्या काही सख्यांनी एकत्र येऊन अंजली सहस्रबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिलामंच पुनरुज्जीवित केला आणि बघता बघता दोन वर्ष पूर्ण सुद्धा झाली. या दोन वर्षात महिलामंचने अनेक उपक्रम केले त्या सगळ्याचच “सार” असा हा वर्धापनदिन होता.

कार्यक्रम नटराजाचे पूजन, प्रमुख पाहुण्या सौख्यदा गोसावी व दीप्ती परांजपे तसेच कलापिनीचे विनायक अभ्यंकर, डॉ. अनंत परांजपे, रेखा भेगडे आणि अंजली सहस्रबुद्धे आणि महिला मंचातील ज्येष्ठ कमलताई हरगापुरे यांच्या हस्ते झाले. नमन नटवरा या नांदीचा आवाज कलापिनीत घुमला आणि कार्यक्रम किती दर्जेदार होणार ह्याची जणू नांदीच झाली.

संगीत शारदा ह्यातील एक नाट्यप्रवेश, अभिनयाचा कोणताही पूर्वानुभव नसलेल्या सख्यांनी सादर केला. संगीत नाटकाचा सुवर्णकाळ आजच्या पिढीने अनुभवला. सुश्राव्य अशी नाट्यपदं सादर झाली आणि रसिक प्रेक्षकांची दाद व टाळ्या मिळवून गेली. नाट्य प्रवेशाचे दिग्दर्शन केले होते ऋचा पोंक्षे यांनी तर लेखन अरुंधती देशपांडे व ऋचा पोंक्षे यांचे होते.

मेधा रानडे, अरुंधती देशपांडे, संगीता देशप्रभू, कृपा नागपाल, सोनाली पडळकर, शांभवी जाधव, ओवी पाचलग आणि स्वरा पन्हाळे ह्यांचा नाट्यप्रवेशांत सहभाग होता. औपचारिक कार्यक्रमामध्ये कलापिनीच्याच सख्यांनी बनवलेले अतिशय सुरेख कागदी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. ज्या सख्यांनी पुष्पगुच्छ तयार केले होते त्यांचा गौरव करण्यात आला.

महिलामंचच्या कार्याध्यक्ष अंजली सहस्रबुद्धे यांनी अहवाल वाचन केले. संपूर्ण कार्यक्रमाला अतिशय सुरेख संगीत साथ देणारे संवादिनीवर प्रदीप जोशी व तबल्यावर चैतन्य लोवळेकर तसच कार्यक्रमाचे फ्लायर , अतिशय कल्पकतेने जयश्री भालशंकर यांनी केले होते

कार्यक्रमाचे सर्वात प्रमुख आकर्षण होते ते म्हणजे कलापिनी महिला मंचचे हस्तलिखित. हस्तलिखिताचे नावच मुळी आविष्कार ठेवण्यात आले आहे. वर्षभरापूर्वी अंजली सहस्रबुद्धे यांनी मांडलेली संकल्पना अतिशय उत्तम रीतीने मूर्त स्वरूपात साकार झाली. महिलामंचच्या अनेक संख्यांनी त्यांच्या कथांमधून, स्वानुभवातून, कवितांमधून स्वतःचा नव्याने आविष्कार झालेला बघितला आणि म्हणूनच हस्तलिखिताचे नाव “आविष्कार” हे अतिशय समर्पक असे ठेवण्यात आले.

WhatsApp Image 2024 09 06 at 09.06.26 1 1

हस्तलिखिताचे मुखपृष्ठ, त्यावरचे सुंदर मंडल आर्ट आणि आतील सर्व चित्रांचे रेखाटन सुप्रिया खानोलकर (Talegaon) ह्यांनि केले. ह्या प्रसंगी ज्या महिलांनी सर्व लेख तपासले, ज्यांनी ते सुवाच्च अक्षरात लिहून काढले तसेच हस्तलिखित बाइंडिंग करणाऱ्या योगेश रहाळकर यांचे सत्कार करण्यात आला. 25 महिलांनी ह्यात लेख लिहिले त्या सर्वांचे कौतुक केले गेले. .

कलापिनीच्या इतिहासातील हा फारच महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण होता. प्रथम हस्तलिखित आणि तेही कलापिनी महिलामंचचे हा खरोखर अभिमानाचा क्षण होता सर्व कलापिनी प्रेमींसाठी. ह्या हस्तलिखिताची सॉफ्ट कॉपी पण तयार करण्यात आली आहे, जेणेकरून सगळ्यांना हे हस्तलिखित वाचता यावं.

त्यानंतर, राखी भालेराव या सखीने, “महिलामंचची सदस्य झाल्यानंतर तिच्यातील ती नव्याने गवसली .प्रत्येक कलेची आवड होतीच परंतु संसारिक जबाबदाऱ्यांनी ह्या सगळ्यापासून दूर गेले होते पण कलापिनीशी नाते जोडले गेल्यावर पुन्हा सगळे कलागुण जोपासता येऊ लागले” असे मनोगत व्यक्त केले

कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी त्यांच्या उत्स्फूर्त शैलीत महिलामंचचे आणि हस्तलिखिताचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमाला लाभलेल्या, संत श्री एकनाथ महाराजांच्या वंशज असलेल्या प्रमुख पाहुण्या सौख्यादा गोसावी यांचा परिचय मधुवंती रानडे यांनी करून दिला. तसेच दीप्ती परांजपे यांचा परिचय कीर्ती देसाई हिने करून दिला. दीप्ती परांजपे ह्या यशस्वी उद्योजिका आहेत. त्यांची कंपनी जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्याचा प्रयत्न करते.

दोन्हीही प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणात कलापिनी व महिलामंच यांच्या कार्याचे उत्स्फूर्त कौतुक केले व कलापिनी आणि महिलामंचचे सदस्य होऊन पुढील जास्तीत जास्त कार्यक्रमात उपस्थित राहण्याचा मानस व्यक्त केला. ज्योती ढमाले आभार मानले आभार मानले.

WhatsApp Image 2024 09 06 at 09.06.27 2

पुढील सत्रात ” हीच आमुची प्रार्थना” ही प्रार्थना कराओके वर आणि त्यानंतर सुधीर फडके यांच्या काही भाव, भक्ती गीतांचे मेडले काही सख्यांनी अतिशय गोड व सुमधुर आवाजात सादर केले.

Pimpri Chinchwad : गणेश उत्सवासाठी पिंपरी चिंचवड पोलीस सज्ज

चल रे भोपळ्या टुणुक टुणुक ह्या गोष्टीचा भाग २ अतिशय रंजक पद्धतीने आपल्या नाटुकल्यात सहज सुंदर अभिनय करत अंजली सहस्रबुद्धे, मंजुषा अभ्यंकर, स्मिता दिवेकर, विशाखा देशमुख, जान्हवी पावसकर , वैशाली लिमये, दीप्ती आठवले व राखी भालेराव यांनी सादर केला. प्रेक्षकांच्या जोरदार टाळ्या व हश्यांनी वातावरण भरून गेले.

या नाटिकेचे दिग्दर्शन अनघा बुरसे यांनी केले होते व ह्या नाटिकेतील तीनही वाघोबांचे मेकअप सुप्रिया खानोलकर व राखी भालेराव यांनी केले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे ओघवते निवेदन ज्योती गोखले यांनी केले होते. संगीताची बाजू लीना परगी यांनी समर्थपणे सांभाळली होती. संगीत संयोजन दिपाली जोशी व जयश्री भालशंकर यांचे होते तर ध्वनी संयोजन सुमेर नंदेश्वर ह्यांनी उत्तम केले .

कार्यक्रमाला कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, विश्वस्त डॉ अनंत परांजपे, शिरीष जोशी तसच कार्यकारिणीतील अशोक बकरे,हेमंत झेंडे, श्रीशैल गद्रे, विनायक भालेराव, संजय मालकर, चेतनभाई शाह उपस्थित होते. प्रत्येक सखीचा सहभाग आणि त्याचे होणारे कौतुक हीच महिला मंचची खासियत आहे. सरते शेवटी कार्यक्रमाची सांगता पठणं विपुलं या श्लोकाने झाली.

तर असा हा सर्वांग सुंदर द्वितीय वर्धापनदिन कलापिनीच्या प्रांगणात अतिशय उत्साहात साजरा झाला. आलेल्या प्रत्येक रसिक प्रेक्षकाने आनंद… आनंद… आणि फक्त आनंद अनुभवला. कलापिनीच्या महिला मंच ने सभासदांचे शतक गाठले आहे .

youtube.com/watch?v=IOYZxQkal4M