एमपीसी न्यूज – तळवडेतील सहयोगनगर येथील वाहतुकीच्या रस्त्यामध्ये 40 वर्षांपासून असलेला (Talewade)टॉवर अखेर हटविण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपॉल उभारण्यात येणार आहे. त्यासाठीची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. मोनोपॉल कमी जागेत उभारल्याने सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान होणारी वाहतूक कोंडी सुटणार आहे. परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. यासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा केला होता.
महापालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत तळवडे प्रभाग क्रमांक 12 मधील सहयोगनगर येथे वाहतुकीच्या रस्त्यामध्ये महापारेषणाचा अतिउच्च दाबाचा (220 kv EHV line) टॉवर सुमारे 40 वर्षांपासून कार्यरत आहे. तळवडे ही औद्योगिक वसाहत तसेच आयटी पार्क असल्यामुळे लोकवस्ती व वाहतूक कोंडी येथे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. टॉवरवरील वीजवाहिनी ही 220 केव्ही एचव्ही या क्षमतेची आहे. या मनो-याच्या खालून धोकादायक पद्धतीने वाहतूक सुरु आहे. महापारेषण कंपनीने हा रस्ता बंद करण्याबाबत वारंवार कळविले. परंतु, हा रस्ता वाहतुकीचा असून तांत्रिक कारणांमुळे बंद करणे शक्य नसल्याचे स्थापत्य विभागाने कळविले आहे. हा मनोरा हलवून रस्त्याच्या दोन्ही कडेला वाहतूक सुरळीत करण्याकरिता सद्यस्थितीत असलेला मनोरा (9.5 – 9.5 ) 50 मीटर पुढे किंवा मागे मोनोपोलद्वारे (3-3 मीटर) करावा. त्याप्रमाणे आवश्यक असलेला मनोका क्रमांक 33 ही स्थलांतरित करणे गरजेचे आहे. जेणेकरुन रस्त्याच्या दोन्ही बाजूस (3-3 मीटर) वाहतुकीस जागा उपलब्ध करण्याचा पर्याय समोर आला होता. त्यावरच तोडगा काढण्यासाठी माजी नगरसेवक शांताराम भालेकर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे नवीन मोनोपोल उभारणीची मागणी केली. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार लांडगे यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याची सूचना केली. त्यानंतर प्रशासनाने हालचाली केल्या.
Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांचा नागरी सत्कार
टॉवर काढण्यात येणार आहे. त्याजागी मोनोपॉलची कमी जागेत उभारणी केली जाणार आहे. हे काम महापारेषण यांच्याशी संलग्न असल्यामुळे महापारेषणमार्फत या कामाचे अंदाजपत्रक प्राप्त झालेले आहे. त्यांच्या पर्यवेक्षणखाली हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी महापारेषणकडील प्राप्त अंदाजपत्रकानुसार दर पृ:थकरण केले आहे. या दरानुसार अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. या कामाच्या 15 कोटी रकमेस प्रशासकीय आणि कामाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यास स्थायी समितीच्या 6 सप्टेंबर 2023 सभेत मान्यता मिळाली आहे. या कामासाठी 7 कोटी 95 लाख 41 हजार 744 रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे लवकरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल.
या भागातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. टॉवरमुळे सहयोगनगर ते त्रिवेणीनगर दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होत होती. टॉवर खालून नागरिकांना ये-जा करावी लागत होती. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारत येत नव्हती. आमदार महेश लांडगे यांनी अधिका-यांना सूचना दिल्या. त्यानंतर प्रशासनाने टॉवर काढण्यासाठी प्रक्रिया केली. आता टॉवर काढून मोनोपॉलची कमी जागेत उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
शांताराम भालेकर
माजी नगरसेवक
तळवडे