Wakad : ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा व्हावा – नितीन चंदनशिवे


एमपीसी न्यूज – ज्ञान हा माणसाचा पहिला डोळा (Wakad) व्हावा आणि तो सदैव उघडा राहावा, असे विचार सांगली येथील सुप्रसिद्ध कवी ‘दंगलकार’ नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केले.

वाकड येथे रविवारी सेवानिवृत्त प्राचार्य, ज्येष्ठ पत्रकार, व्यंगचित्रकार आणि कवी कै. रा. ना. तथा दिनेश रोडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त काव्यजागर पुरस्कार स्वीकारता चंदनशिवे बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ह. भ. प. अशोकमहाराज गोरे, डॉ. अतुल रोडे, छायादेवी रोडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

Bhosari : भोसरीतील परिस्थिती म्हणजे, ‘दिसली मोकळी जागा की, मार ताबा’…

नितीन चंदनशिवे पुढे म्हणाले की, आईच्या कवितेत बापाची जागा शोधायची असते. कोणत्याही क्षणी बाप आपल्याला फोन करतो, यासारखी जगात दुसरी आनंददायी गोष्ट नाही. कविता कवीला पैसे देतेच असे नाही; पण (Wakad) अपार समाधान देते. एका समर्पित कवीचे आशीर्वाद म्हणजे हा पुरस्कार आहे.

याप्रसंगी आय. के. शेख, शामराव सरकाळे, जयंती रोडे-बनकर, डॉ. अशोक लांडगे यांनी कविता सादर केल्या; तर शुभांगी शिंदे, गणेश ढगे, नितीन बनकर, कल्पना रोडे-कोल्हे यांनी मनोगते व्यक्त केलीत. अंबादास रोडे यांनी प्रास्ताविकातून दिनेश रोडे यांच्या व्यक्तिमत्त्वातील विविध पैलूंवर भाष्य करीत हृद्य आठवणींना उजाळा दिला. सुरेश कंक यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “वास्तव अनुभव मांडणार्‍या कविता काळजाला हेलावून टाकतात!” असे मत मांडले.

दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. पृथ्वीराज रोडे, धनंजय रोडे, सत्यम रोडे, सुप्रिया ढगे, भक्ती रोडे, डॉ. विकास शेटे आणि रोडे परिवार यांनी संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अतुल रोडे यांनी आभार मानले.