Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार

[ad_1]

एमपीसी न्यूज – राज्य शासनाच्यावतीने द्राक्ष बागायतदारांच्या समस्या प्राधान्याने (Wakad)सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

वाकड येथे 24 ते 26 ऑगस्ट या कालावधीत आयोजित द्राक्ष परिषदेचा समारोप उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, उपाध्यक्ष कैलास भोसले, खजिनदार सुनील पवार, माजी अध्यक्ष सुभाष आर्वे यावेळी उपस्थित होते.

जवळपास एकवीस हजार सभासद संख्या असलेल्या या संघाच्या वार्षिक बैठकीला कधी काळी आपण द्राक्ष उत्पादक म्हणून उपस्थित होतो असे सांगून, उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, तीन दिवसीय द्राक्ष परिषदेच्या माध्यमातून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाने चर्चा केली आणि त्यांच्या समस्यांचा आढावा घेतला. हा संवाद असाच पुढे सुरू ठेवावा. विविध पिकांसाठी पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये द्राक्ष पीकाचा समावेश करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.

शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विविध योजना राबविण्यात येतात. मागेल त्याला सौरपंप योजना अर्थसंकल्पामध्ये जाहीर केली असून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. कृषी वाहिन्यांचे सौर उर्जिकरण करण्यात येत आहे. सौर कृषी पंप प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यावर वीजचे दर कमी होण्याबरोबर या योजनेच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सात हजार कोटी रुपये खर्चाच्या नार-पार-गिरणा नदी जोड प्रकल्पाला शासनाने मान्यता दिली असून नाशिक, जळगांव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. नवनवीन तंत्रज्ञान आणि शेती अवजारांचा शेतकऱ्यांनी वापर करुन शेतीची कामे करावी असे आवाहन त्यांनी केले.

Pune : किरकोळ कारणावरून मित्राकडूनच चाकूने वार करत  खून 

द्राक्ष निर्यातीसाठी अमेरिकेची बाजारपेठ मोठी असल्याने अमेरिकेत द्राक्ष निर्यात करणे, द्राक्ष वाहतूकीसाठी रेल्वेचे जाळे उभारणे, द्राक्षावर प्रक्रिया केल्यानंतर लागू होणारा जीएसटी कमी करणे, हळदी पिकाप्रमाणे बेदाण्यावर जीएसटी आकारणी, 2009-10 साली युरोपमध्ये निर्यात केलेल्या परंतु, नाकारण्यात आलेल्या द्राक्षांसाठी नुकसान भरपाई देणे हे प्रश्न केंद्र शासनाच्या कक्षेतील असून, केंद्रीय वाणिज्य मंत्री तसेच अन्य संबधित मंत्र्यांसमवेत यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात येईल आणि द्राक्ष उत्पादकांच्या समस्या सोडविण्यात येतील असे आश्वासन पवार यांनी दिले.

केंद्र शासनाची लखपती दीदी योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे दीड हजार रुपयांची मदत अशा महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार असल्याचे सांगून, पात्र महिलांनी या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन पवार यांनी केले.

यावेळी यशस्वी द्राक्ष उत्पादकांचा प्रातिनिधीक स्वरुपात उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले यांनी प्रास्ताविक केले. महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर द्राक्षे निर्यात होतात, त्यापासून जवळपास 3 हजार 500 रुपयांचे परकीय जलन प्राप्त होते अशी माहिती त्यांनी दिली. बैठकीला द्राक्ष उत्पादक शेतकरी, शेतीसाठी आवश्यक अवजारे आणि औषधांचे उत्पादक, शेतकरी मोठ्या संख्यने उपस्थित होते.

 

 

[ad_2]