Wakad : सहकारी बँकेच्या संचालकांनी डोळ्यात तेल घालून  बँक चालवावी- अजित पवार


एमपीसी न्यूज –  सहकारी बँकांचे संचालक पद अतिशय महत्वाचे असून, संचालक मंडळाने ग्राहक हिताचे निर्णय घ्यावे आणि बँकिंग कायदे (Wakad) कडक केलेले असल्यामुळे नियमानुसार, डोळ्यात तेल घालून  बँका चालवावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वाकड येथील शाखेचा नूतन वास्तूमध्ये स्थलांतर समारंभात उपस्थितांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनिल चांदेरे, संचालक माऊली दाभाडे, प्रविण शिंदे, शैलजा बुट्टे पाटील, प्रदीप कंद, विकास दांगट, मुख्याधिकारी अनिरुद्ध देसाई, सरव्यवस्थापक संजय शितोळे, उपसरव्यवस्थापक समीर राजपूत, सुनिल खताळ यावेळी उपस्थित होते.

Wakad: द्राक्ष बागायतदारांच्या समस्या सोडविणार-अजित पवार

बँकींग क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आले असून त्याचा वापर करुन बँकेने ग्राहकांना चांगली सेवा द्यावी. ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बँक प्रशासनाने काम केले पाहिजे. निष्काळजीपणे बँका चालविल्याने बँका अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे संचालक मंडळाने आर्थिक शिस्तीचे पालन करावे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक शून्य टक्के व्याजदराने शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देते, परंतु शेतकऱ्यांनी त्या कर्जाची वेळेवर परतफेड करतानाच सावकाराच्या मोहाला बळी न पडता गैरव्यवहार होणाऱ्या आणि गुंतवणूकीवर अधिक व्याज देणाऱ्या बँकामध्ये शेतकऱ्यांनी पैसे गुंतवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना घरबसल्या बँकेच्या सेवा मिळत असल्याने, ऑनलाईन व्यवहार करताना ग्राहकांनी काळजी घ्यावी  असे पवार म्हणाले. त्यांनी बँकेच्या वाटचालीस  शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र महिला लाभार्थ्यांना दीड हजार रुपयांची मदत देण्यात येत आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली असून येत्या 31 ऑगस्ट रोजी नागपूर येथे होणाऱ्या कार्यक्रमाद्वारे सुमारे दीड कोटी महिलांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे. या महत्त्वाच्या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येणार असून, महिलांना कुटूंबाच्या गरजा पूर्ण करण्याबरोबरच आर्थिक उन्नती साधता येणार आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तीन महिला खातेदारांची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत झीरो बॅलन्स खाती सुरु करण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक मंडळ, सभासद मोठ्या संख्येने (Wakad) उपस्थित होते.