Nigdi : अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी शिक्षक आणि मुख्याध्यापकाला पोलीस कोठडी; इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी


एमपीसी न्यूज – सहा वर्षांपूर्वी शाळेतील एका मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी (Nigdi)पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या खेळाच्या शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वर्ष लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि. 23) निगडी मध्ये उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी नराधम शिक्षक, मुख्याध्यापकासह संस्थेच्या अध्यक्ष आणि इतर सदस्यांना अटक केली. आरोपी शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

निवृत्ती देवराम काळभोर (रा. चिंचवड), मुख्याध्यापक अशोक जाधव अशी पोलीस कोठडी झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर लि सोफिया एज्युकेशन सोसायटी पुणे या ट्रस्टचे अध्यक्ष रोहिदास बलभिम जाधव, लक्ष्मण नामदेव हेंद्रे, अविंद्र अंकुश निकम, गोरख सोपान जाधव, हनुमंत दादा निकम आणि शुभांगी अशोक जाधव यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

निगडी मधील एका शाळेत पीडित मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. आरोपी काळभोर हा शाळेत खेळाचा शिक्षक आहे. काळभोर हा पिडीत मुलीस वारंवार लैंगीक त्रास देत असे. पिडीत मुलीच्या वर्गातील विदयार्थ्यांना पिटीच्या क्लाससाठी ग्रांउडवर घेवून जात व येत असताना पिडीत मुलीशी अश्लील चाळे करीत असे. तसेच, हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला लय मारीन अशी धमकी देत असे.

Alandi: संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ

21 ऑगस्ट रोजी पिडीत मुलगी ही वॉशरूम वरून बाहेर येत असताना काळभोर याने पुन्हा तिच्याशी अश्लील वर्तन केले. अखेर मुलीने घरच्यांना हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

आरोपी निवृत्ती काळभोर याच्याविरुध्द निगडी पोलीस ठाण्यात 2018 मध्ये शाळेतीलच एका अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयामध्ये काळभोर हा न्यायालयातून जामिनावर बाहेर आला होता. तरीसुध्दा त्याला शाळा व्यवस्थापनाने पुन्हा शाळेत नोकरी दिली. काळभोर यांच्यासारखा विकृत वृत्तीचा व्यक्ती तुरुंगात होता हे माहित असताना देखील शाळा व्यवस्थापनाने त्याला पुन्हा शाळेत नोकरीवर घेतले. हे एका पध्दतीने लैंगीक अत्याचाराच्या गुन्हयांना प्रोत्साहन दिल्यासारखे असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सर्व आरोपींना अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने शिक्षक आणि मुख्याध्यापक यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.