Pimpri :ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांनी देखील आवश्यक कागदपत्रासह रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे


एमपीसी न्यूज -पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित रोजगार मेळाव्याचे उद्घाटन सोमवारी, 26 ऑगस्ट रोजी आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते होणार असून ऑनलाइन अर्ज भरलेल्या तसेच ऑनलाइन अर्ज न भरलेल्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दिव्यांग भवन, मोरवाडी, पिंपरी, पुणे येथे सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5 या वेळेत उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

राज्य शासनाच्या वतीने राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळविण्याची तसेच उद्यमशीलता क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” सुरु करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सोमवार, 26 ऑगस्ट रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांच्या सहकार्याने भव्य कार्यप्रशिक्षण उमेदवार रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यप्रशिक्षण उमेदवार रोजगार मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार आणि नागरी विमान वाहतूक विभागाचे केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपस्थित राहणार आहे. यासोबतच विशेष अतिथी म्हणून सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची उपस्थिती असणार आहे. तसेच खासदार मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, वंदना चव्हाण, सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, संग्राम थोपटे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

Pune: म्हाडाचे निर्वाचीत अध्यक्ष  शिवाजीराव आढळराव पाटील यांचा  नागरी सत्कार

महापालिकेच्या वतीने फिल्ड सर्वे इन्युमरेटर, माळी, मल्टी टास्कींग स्टाफ, स्थापत्य अभियंता, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य निरीक्षक, वायरमन, विद्युत अभियंता, डी.टी.पी. ऑपरेटर, लिपिक, शिपाई अशा विविध पदांच्या एकूण 575 उमेदवारांना 6 महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 23 विभागांमध्ये 575 प्रशिक्षणार्थींच्या जागा भरण्यासाठी एकत्रितपणे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह (झेरॉक्स) युवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

युवांच्या सोयीसाठी मेळाव्याच्या ठिकाणी विभागानुसार स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत जेणेकरून इच्छुक उमेदवार संबंधित पदाच्या स्टॉलमध्ये जावून अर्ज करू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले आहे.

इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे तसेच पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करावे. यासोबतच इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून महापालिकेच्या विभागवार प्रशिक्षणास इच्छुक असल्याची नोंद करणेही गरजेचे आहे. तसेच ऑनलाइन अर्ज न केलेल्या उमेदवारांना देखील या मेळाव्यात सहभागी होऊन या संधीचा लाभ घेता येणार आहे.