Pimpri : झिरो वेस्ट शाळा उपक्रम


एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील (Pimpri)विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी तसेच त्यांच्यामध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी व महापालिकेच्या शाळा कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शाळा स्तरावर कचरा मुक्त शाळा (झिरो वेस्ट शाळा) हा उपक्रम राबविणे तसेच पुणे जिल्ह्यातील 20 शिक्षकांचे पिंपरी-चिंचवड महापालिकेत वर्गीकरण करणे या विषयांसह विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी झालेल्या बैठकीत मान्यता दिली.

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय आज प्रशासक सिंह यांच्या मान्यतेसाठी विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आले होते. पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रशासक सिंह यांनी विविध विषयांना मंजुरी दिली. या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त तथा नगरसचिव चंद्रकांत इंदलकर यांच्यासह विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.

महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छ पिंपरी चिंचवड शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने महापालिकेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा भाग म्हणून महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शाळांमध्ये झिरो वेस्ट शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागृती करून त्यांच्यात लहानपणापासूनच कचरा व्यवस्थापनाची कौशल्य विकसित करण्यास मदत होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये तीन महिन्यामध्ये एकूण 4 टप्प्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्यासाठी शाळांना निधी देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकूण 97 शाळा या उपक्रमाअंतर्गत कचरामुक्त करण्यात येणार आहेत. त्यानुषंगाने आज हा विषय विशेष बैठकीमध्ये ठेवण्यात आला होता,त्यास प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली.

20 शिक्षकांची सेवा महापालिकेत वर्गीकरण

जिल्हा परिषद पुणे यांच्याकडील 20 शिक्षकांची सेवा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्याबाबतच्या विषयाला देखील प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली आहे. राज्य शासनाच्या नगर विकास विभाग आणि ग्रामविकास विभाग यांच्या निर्णयानुसार विहित तरतुदी, न्यायालयीन प्रकरणे व इतर सर्व प्रचलित नियम या सर्व बाबींचे पालन करून वर्गीकरणाची प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

विशेष बैठकीतील मंजूर विषय

महापालिकेचे रस्ते, उद्याने, मोकळ्या जागा, चौक याठिकाणी लागवडीसाठी हंगामी रोपे पुरविणे, महिला बचत गटांच्याद्वारे सामुदायिक शौचालयांचे साफसफाई व देखभाल करणे, आरोग्य विभागासाठी आवश्यक असलेले साहित्य खरेदी करणे तसेच विविध विभागातील आवश्यक कामांसाठी तरतूद वाढ, घट आणि वर्गीकरण करणे, शासकीय जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा 2024-25 च्या अनुषंगाने येणाऱ्या खर्चास मान्यता देणे अशा विविध विषयांना प्रशासक शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत मान्यता दिली.