Wakad : पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून झाला ‘त्या’ व्यक्तीचा खून; आरोपीला बारा तासांत बीड मधून अटक


एमपीसी न्यूज – पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एकाने सोबत काम (Wakad)करणाऱ्या पेंटरचा सिमेंटच्या गट्टूने ठेचून खून केला. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी साडेआठच्या सुमारास काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ उघडकीस आली. दरम्यान वाकड पोलिसांनी अवघ्या बारा तासात आरोपीला बीड येथून बेड्या ठोकल्या आहेत.

बाळु विठ्ठल साळवे (वय 32, रा. श्रीनगर कॉलनी, रहाटणी. मुळ रा. केसापुरी, माजलगाव, बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अली अन्सारी (वय 35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

PCMC : विधिमंडळ कामकाज आणि शासनाशी समन्वय करण्यासाठी समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक

वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी काळेवाडी फाटा ते तापकीर चौक रस्त्यावरील धनगरबाबा मंदिराजवळ अंदाजे 35 वर्षे वयाचा पुरुष बेशुध्द अवस्थेत पडल्याची माहिती वाकड पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात एक मृतदेह असल्याचे दिसून आले. पोलिसांनी परिसरात चौकशी करून अली अन्सारी याची ओळख पटवली. तसेच, तो पेंटर असल्याचे पोलिसांना समजले.

दरम्यान, गुन्हा उघडकीस आणण्यासाठी तपास पथकातील अधिकारी, अंमलदार यांची दोन पथके तयार करण्यात आली. दोन्ही पथकांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरु केला. प्रत्यक्ष साक्षिदार, घटनास्थळ आणि आजुबाजूच्या सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे अली अन्सारी याच्या सोबत काम करणारा बाळु साळवे (रा. रहाटणी फाटा) याने हा खून केल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी रहाटणी परिसर पिंजून काढत आरोपीचे घर शोधून काढले. आरोपीच्या पत्नीकडे पोलिसांनी विचारपूस केली असता तिने आपला पती घरी आलाच नसल्याचे सांगितले. त्यानंतर तांत्रिक माहितीच्या आधारे बाळू साळवे हा त्याच्या मुळ गावी गेल्याची माहिती पुढे आली. त्यानुसार, एका पथकाने थेट बीड गाठले. मूळ गावातून आरोपीला ताब्यात घेतले.

मृत अली अन्सारी आणि आरोपी बाळु साळवे सुमारे एक वर्षापासून सोबत पेंटिंगचे काम करीत होते. त्यांचे एकमेकांच्या घरी जाणे-येणे होते. आरोपी बाळू याची पत्नी आणि मृत अली अन्सारी याच्यात अनैतिक संबंध असल्याचा संशय बाळू याला होता. या संशयावरुन त्याने सिमेंटच्या गट्टूने ठेचून अन्सारी याचा खून केला.